धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक सरसावले आहेत. उपळा पंचायत समिती गणातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून, या गणातून भाजपाकडून पुनमताई पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. काजळा (ता.जि. धाराशिव) येथील त्या रहिवासी असून विद्यमान सरपंच तथा आ. राणादादा यांचे कट्टर कार्यकर्ते प्रविण पाटील यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. पुनम पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, कार्यकर्त्यांसह समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्याची रणनीती आखली आहे. दरम्यान भाजपासाठी सौ. पाटील यांची उमेदवारी अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सौ. पाटील यांच्या उमेदवारीकडे समर्थकांसह मतदारसंघाचे लक्ष वेधले आहे.
धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना आता वेग येत आहे. या मतदारसंघात उपळा, वरूडा, पवारवाडी, वाघोली, काजळा, सारोळा, शिंदेवाडीसह दारफळ या गावांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण 19 हजार मतदार आहेत. उपळा पंचायत समिती गणात उपळा, पवारवाडी, वरूडा आणि काजळा या गावांचा समावेश होतो. तर वाघोली पंचायत समिती गणात वाघोलीसह सारोळा, शिंदेवाडी आणि दारफळ ही गावे येतात. उपळा पंस गणातून तत्कालीन काँग्रेसचे अश्रुबा माळी यांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे काजळा गावाला पंचायत समिती सदस्याचा मान मिळाला होता. यावेळी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर केल्याने राजकीय घडामोडी तेज झाल्या आहेत. उपळा पंचायत समिती गणाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी या मतदारसंघात मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, काजळा येथील विद्यमान सरपंच तथा भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थक प्रवीण क्षीरसागर- पाटील यांच्या सौभाग्यवती पुनम पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी समोर आले आहे. मात्र जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव तर उपळा पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे प्रवीण पाटील यांच्या सौभाग्यवती पुनम पाटील यांना उपळा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांसह समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. सौ. पुनम प्रवीण पाटील या सुशिक्षित असून, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सक्षम उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे पाटील यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या गणासाठी अनेक महिला उमेदवारांची नावे पुढे केली जात असली तरी, पुनम पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे काजळा गावासह संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधले आहे.