धाराशिव, (प्रतिनिधी) -जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ च्या तब्बल ४९८ कोटी निधीला कुठलीही स्थगिती नाही, हे आमदार कैलास पाटील यांना चांगलेच ठाऊक आहे. एवढेच नव्हे तर १७ सप्टेंबर रोजी २०२५-२६ च्या निधीतून घेण्यात आलेल्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, हे देखील त्यांना माहीत आहे.

तरीसुद्धा, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सदर कामास २०२४-२५ ची प्रशासकीय मान्यता असली तरी, आरोग्यविषयक महत्वाची बाब म्हणून सदर कामाला २०२५-२६ च्या निधीतून तरतूद करता येते. गरजेनुसार निधीची उपलब्धता करता येते, हे त्यांना ठाऊक असूनदेखील ते बँकांच्या नोटीस प्रकाराप्रमाणे पुन्हा एकदा राजकीय नौटंकी करत आहेत, हे दुर्दैवी आहे.

जर खरंच कैलास पाटलांना जनतेच्या आरोग्याची काळजी असती, तर त्यांनी पालकमंत्र्यांना कॅथलॅबच्या अनुषंगिक कामासाठी २०२५-२६ मधून निधी द्यावा अशी मागणी केली असती. खरा प्रश्न असा आहे की २०२४-२५ च्या कामांना स्थगिती का मिळाली..? याचं सत्य आम्ही लवकरच जनतेसमोर आणणार आहोत.


 
Top