वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या फरक बिलाच्या प्रश्नावर पंचायत समितीकडून अखेर निर्णय घेण्यात आला असून, फरक रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे  कॉ. पंकज चव्हाण यांनी वाशी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या समोर ठाम व मुद्देसूद मांडणी करत प्रभावी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येताच पंचायत समिती प्रशासनाने फरक बिलाच्या अंमलबजावणीस मान्यता देत तातडीने कार्यवाही सुरू केली. महासंघाने या मागणीसाठी यापूर्वी निवेदन दिले होते. मात्र ठराविक कालावधीत रक्कम जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत फरक बिलाचा प्रश्न मार्गी लावला.


संघर्षाला यश, कर्मचाऱ्यांत उत्साह

फरक बिलाच्या अंमलबजावणीमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटनेतर्फे कॉ. पंकज चव्हाण यांचे नेतृत्व आणि प्रभावी भूमिका याबद्दल कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

या आंदोलनाला वाशी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भास्कर शिंदे, अहमद भाई काझी, पत्रकार शाहजी चेडे, सामाजिक कार्यकर्ते गवारे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. उपोषण सोडविण्याच्या प्रसंगी गटविकास अधिकारी ओकार गायकवाड, सुरेश कवडे, कॉ. पंकज चव्हाण, तसेच पंचायत विस्तार अधिकारी विलास माचवे उपस्थित होते.


तालुका कार्यकारिणीची निवड

यावेळी तालुका कार्यकारिणीची निवड ही पार पडली. जिल्हा सचिव चंद्रशेखर काशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत खालील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष बिभीषण लोकरे, उपाध्यक्ष मनोज लाखे, सचिव किरण शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी राहुल डोके, ज्ञानेश्वर फरताडे, श्रीकांत जगताप, रामेश्वर पंडित, धनंजय वाघमारे, दिनकर जोगदंड यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

 
Top