नळदुर्ग (प्रतिनिधी)- आई राजा उदो, उदो, सदानंदीचा उदो, उदो, बोल भवानी माता की जयचा प्रचंड गजर आणि भव्य पालखी छबीना मिरवणुक सोहळ्याने नळदुर्ग शहरात सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. 2 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग शहरात पारंपारीक पद्धतीने सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विजयादशमी निमित्त सायंकाळी 6 वा. अंबाबाईची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो हिंदु बांधव सहभागी झाले होते. विजयादशमीनिमित्त सकाळी येथील प्राचिन अंबाबाई मंदिरात श्री अंबाबाईची महापुजा करण्यात आली. पहाटे पासुनच भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी 6 वा. श्री अंबाबाईची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शेकडो आराधी महिला हातात पोत घेऊन हलगीच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. सायंकाळची वेळ आणि आराधी महिलांच्या हातातील पेटलेले पोत यामुळे वातावरणत प्रसन्नता निर्माण झाली होती. यावेळी मंदिर परीसरात हजारो हिंदु बांधव जमले होते. ही पालखी मुरवणुक मंदिरापासुन निघाल्या नंतर शास्त्री चौक, राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, लोकमान्य वाचनालय, संविधान चौक मार्गे पारंपारीक सिमोल्लंघन मैदानात आली. याठिकाणी पारंपारीक पद्धतीने सिमोल्लंघन करून सोने म्हणुन शमीच्या झाडाची पाने लुटुन सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरापासुन निघालेल्या पालखी मिरवणुकीचे चौकाचौकात हिंदु बांधवांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. शास्त्री चौकात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी विशेष करून महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर लोकमान्य वाचनालय व सिमोल्लंघन मैदान परीसरातही आंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंदिर समिती व नगरपालिकेच्या वतीने मिरवणुकीत आकर्षक अशी शोभेची दारू उडविण्यात आली. या मिरवणुकीत नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने फुलांनी सजविलेल्या रथामधुन देवीच्या मुर्तीची भव्य मिरवणुक काढण्यात आली. प्रारंभी श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्टच्या वतीने मानकऱ्यांचा सालाबादाप्रमाणे पान सुपारी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, संचालक सुरेश गायकवाड, राजेंद्र सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानकऱ्यांचा सत्कार केला यानंतर भव्य पालखी मिरवणुक सोहळ्यास सुरुवात झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांनी आई राजा उदो, उदो, सदानंदीचा उदो, उदो, बोल भवानी माता की जय या घोषणानी परीसर दुमदुमुन गेला होता. सिमोल्लंघन सोहळ्यानंतर पालखी मिरवणुक संविधान चौक, माऊली नगर मार्गे मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
या पालखी मिरवणुकीत हिंदु बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्याचबरोबर शेकडो आराधी महिला हातात पोत व गळ्यात कवड्यांची माळ घालुन अंबाबाईच्या भक्तीरसात तल्लीन झाले होते.
