धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय जीवन असो की महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांना सहलीचे आकर्षण असते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र सहलीचे रूपांतर अभ्यास दौऱ्यामध्ये होते. असाच एक महत्त्वाचा अभ्यास दौरा नुकत्याच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते, प्रा. डी. एच. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण केला. भारतामधील अध्ययावत आणि नामांकित कंपन्यापैकी असलेली एक कंपनी इंडो जर्मन टूल, छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच विद्यार्थ्यांनी भेट देऊन आपला अभ्यास दौरा पूर्ण केला. मुलांना प्रॅक्टिकल माहिती सोबतच जगाचे अद्ययावत ज्ञान देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या ट्रीपला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत माहितीपूर्ण असा हा अभ्यास दौरा पूर्ण केला.
या अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सी एन सी, व्ही एम सी, अद्ययावत स्टूल अशा मशनरीची माहिती घेतली. इंडो जर्मन टूल ही देशातील मोठ्या कंपनीपैकी एक कंपनी असून या कंपनीने खास या मुलांसाठी कॅम्प अरेंज केला होता. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनशिप, वर्कशॉप,शासकीय असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन त्या अंतर्गत घेतलेल्या चाचणीमधून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. इंडो जर्मन टूल च्या वतीने या कंपनीचे श्री पुंड यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी अनिकेत देशमुख यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.