तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या अश्विन पौर्णिमेत पावसामुळे सेवा पुर्ण न करी शकलेले भाविक सध्या सेवा अर्पण करण्यासाठी तिर्थक्षेञी तुळजापूरात गर्दी करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या शुक्रवारी, शारदीय नवरात्रोत्सव काळात पावसाच्या संततधारांमुळे देवीदर्शन व वारीसेवा पूर्ण करू न शकलेल्या हजारो भाविकांनी आज तिर्थक्षेत्र तुळजापूरात मनोभावे देवीचरणी हजेरी लावली.
गुरुवार रात्रपासूनच तुळजाभवानीच्या नगरीत भाविकांची मोठी गर्दी जमू लागली होती. शुक्रवारी पहाटे श्रीगोमुख, श्रीकल्लोळ आणि तिर्थकुंडात स्नान करून भक्तांनी देवीचे दर्शन घेतले आणि शारदीय नवरात्रोत्सवातील सेवावारी अर्पण केली. शहरातील रस्ते, घाट आणि मंदिर परिसर “जय तुळजाभवानी”च्या घोषात दुमदुमून गेले.
दोन्ही महाद्वार भक्तांसाठी खुले
शारदीय नवरात्रोत्सव काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने विशेष व्यवस्था केली होती. दिनांक 21 सप्टेंबर रोजी पहाटे 1.00 वाजेपासून ते 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत भाविकांना घाटशिळ पार्किंग येथून बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपातून मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. तथापि, पौर्णिमेनंतरच्या या पहिल्या शुक्रवारी देवीदर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रचंड पायपीट करावी लागली. अनेक भाविकांनी दर्शनासाठी रांगेत उभे राहत देवीच्या जयघोषात मनोभावे वारीसेवा पूर्ण केली, तर काही भाविकांनी गर्दीमुळे महाद्वारासमोर हात जोडून देवीचरणी नतमस्तक होऊन वारीसेवा अर्पण केली.