भूम (प्रतिनिधी)- सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भवानवाडी गावाच्या नजीक असणारा टेंभी आई मंदिराजवळील तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्या तलावाला सांडवा नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर स्थितीची दखल भवानवाडी येथील आशा कार्यकर्ती सुरेखा महानोर यांनी घेतली. त्यांनी प्रा. आरोग्य केंद्र पाथरूड येथील गटप्रवर्तक उषा गायकवाड यांच्याशी तातडीने संपर्क साधून तलाव भरल्याची माहिती दिली. गटप्रवर्तक गायकवाड यांनी तत्काळ कार्यवाही करत ही बाब तालुकास्तरावर पोहोचवली व भूम तालुक्यातील नायब तहसीलदार जाधव यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच नायब तहसीलदार जाधव यांनी कोणतीही वेळ न घालवता तलाठी व स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी त्वरित परिस्थितीचा आढावा घेत रात्री 10 वाजता पडत्या पावसात जीसीपी उपलब्ध करून दिली. जीसीपीच्या साहाय्याने तलावातील पाण्याचा निचरा करण्यात आला आणि संभाव्य दुर्घटना टळली.
घटनेनंतर भवानवाडी येथील पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बब्रुवान कांबळे, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर कर्मचारी तसेच समस्त गावकरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गटप्रवर्तक उषा गायकवाड, आशा कार्यकर्त्या सुरेखा महानोर आणि तहसीलदार जाधव यांचे कर्तृव्यदक्षपणा दाखविल्याबद्दल तिघांचेही कौतुक होत आहे.