भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण पवार यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने व दोन बँकांचे कर्ज थकल्यामुळे तणावाखाली आत्महत्या केली होती. माजी मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी मात्रेवाडी येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. तसेच, “बँका त्रास देत असतील तर माझ्याशी संपर्क साधा, मी स्वतः लक्ष देईन,” असे आश्वासन दिले.

पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी शासनाला तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. “सध्या शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. शासनाने 50 हजार रुपये प्रति एकर मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “माणसं वाचली तरच शक्तिपीठांवर जातील, त्यामुळे अशा खर्चिक कार्यक्रमांवर नियंत्रण आणा, छोटे व्यापारी व शेतकऱ्यांना मदत करा. मुंबई-पुण्यात पैसा गुंतविणे बंद करा व तोच निधी शेतकऱ्यांसाठी वापरा. दिल्ली, साई ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट, अदाणी, आंबानी कडून निधी आणा. एकेक जिल्हा वाचवा. 15 हजार कोटी घेऊन पळणाऱ्यांना सोडता, पण माझा शेतकरी दीड लाख रुपयासाठी आत्महत्या करतोय, हे दुर्दैवी आहे.” शैक्षणिक शुल्क माफ करणे व जातधर्म न पाहता दवाखान्यांमध्ये मोफत उपचार देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी नाना मदने, गजानन सोलनकर, ॲड. विकास पाटील, आश्रुबा कोळेकर तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top