धाराशिव (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या घरातील पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यात यावी. तसेच त्यांच्या वयात काही प्रमाणात सवलत देण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मिळणारी संपूर्ण सन्मान पेन्शन बंद केली जाते. त्यामुळे ते कुटूंब आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत असल्यामुळे त्यांच्या पाल्यांनाही काही प्रमाणात का होईना सन्मान पेन्शन देण्यात यावी. जे राज्य स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांनाही केंद्रीय स्वातंत्र्य सैनिक म्हणून दर्जा देऊन त्यांनाही केंद्र शासनाची सन्मान पेन्शन देण्यात यावी. कारण ते देखील भारत देश स्वतंत्र व एक संघ होण्यासाठी लढले असून स्वातंत्र्य सैनिक हा एका गल्लीचा, जिल्ह्याचा किंवा प्रांताचा नसतो तर तो संपूर्ण देशाचा असतो. तसेच स्वातंत्र्य सैनिकांनाही नवीन घर बांधण्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात यावे. त्याबरोबरच काही स्वतंत्र सैनिकांचे अर्ज स्वातंत्र्य सैनिक होण्यासाठी केलेले आहेत. ते पुरावे व सर्व कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करून ते अर्ज शासनाकडे गेल्या 30 ते 32 वर्षांपासून मंजूर न करता अद्यापपर्यंत प्रलंबित असल्यामुळे ते मंजूर करण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शीला उंबरे, स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे जिल्हाध्यक्ष गोविंद नलावडे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

 
Top