धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत अखेर आजजाहीर झाली असून, यावेळी महिला आणि पुरुषांना समान संधी मिळाली आहे. आठपैकी चार पदे महिलांसाठी तर चार पदे पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
जाहीर झालेल्या आरक्षणानुसार कळंब, धाराशिव आणि परंडा या तीन पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिलांना आरक्षण मिळाले आहे. तर उमरगा तालुक्यात अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी, लोहारा तालुक्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी, वाशी तालुक्यात ओबीसी महिलांसाठी तर भूम आणि तुळजापूर येथे सर्वसाधारण घटकासाठी सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील राजकारणाला वेग आला असून, संभाव्य उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातही पुढाऱ्यांमध्ये समीकरणे जुळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. पंचायत समिती सभापती निवडणुकीत या आरक्षणाचा मोठा परिणाम होणार असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होताच तालुकास्तरावरील लढती रंगणार आहेत.