धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे जाहीर ग्रामसभेत जाहीर वाचन केले जाणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती चुकीची नोंदविली गेली असेल तर त्यात वेळीच दुरुस्ती करता येणार आहे. पंचनामा म्हणजे पुरावा आहे. शासनाकडून मदत मिळताना हा पंचनामा सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी ग्रामसभेत जाहीर वाचन होत असताना प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीची आकडेवारी लक्षपूर्वक पाहून घ्या. क्षेत्र योग्य लागले आहे काय, जमीन खरवडून गेल्याची नोंद आहे काय? ड्रीप, पंपसेटचा उल्लेख करण्यात आला आहे काय? हे पाहून चुकीची माहिती तातडीने दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्याला भरीव मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य होईल. असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि मदत वाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार ठामपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. अडचण मोठी आहे. नुकसानही मोठे झाले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असा निसर्गाचा प्रकोप आपल्याला नेहमीच सहन करावा लागत आहे. तरीदेखील खचून न जाता आपण प्रत्येकवेळी उभारी घेतली आहेच. यावेळीही पुन्हा एकदा या संकटावर मात करून आपण ताठ मानेने उभे राहणार आहोत. अशावेळी आम्ही सगळे आणि आपले महायुती सरकार आपल्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाहीत हाच विश्वास आणि दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दरेकर याठिकाणी आले असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विकास कुलकर्णी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



विमा न भरलेल्यांनाही मदत

प्रशासनाकडून सध्या पीक कापणी प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर आपले जातीने लक्ष आहे. वेळोवेळी त्याची इत्यंभूत माहिती आपण घेत आहोत. पिकविम्याच्या माध्यमातून हेक्टरी 30 हजार रुपयांपर्यंत मदत मिळावी असे आपले प्रयत्न सुरू आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही त्यांनाही मदत मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.

 
Top