धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.13 ऑक्टोबर रोजी अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन आलेल्या त्या 3 ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होताच भाजपाकडून स्वागत करण्यात आले. या वस्तूंमध्ये दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत भाजपा नेते माजी मंत्री तथा अमरावतीचे आमदार प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे मदतीचा मोठा हात पुढे करत अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी 3 ट्रक भरलेले अन्नधान्य, कपडे आणि घरगुती आवश्यक साधनसामग्री पाठवले आहे. सदरील साधन सामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत थेट गरजूंना वितरित करण्यात येणार आहे. या ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच प्रमुख अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, मकरंद पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.