धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव आणि तालुका विधी सेवा समित्या यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवत मौजे कौडगाव (ता. परांडा) येथे नुकतेच पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनात सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “राष्ट्रीय बालिका दिन” निमित्त आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा,बालस्नेही योजना तसेच राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या योजना या विषयांवर माहिती देण्यात आली. परांडा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जिल्हाभरातील न्यायाधीशांच्या वतीने संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री.एफ.ए.एम.ख्वाजा, जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश,परांडा,श्रीमती भाग्यश्री पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,धाराशिव, ए.ए.शेख,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, परांडा,श्री.सूर्यभान हाके, गटशिक्षणाधिकारी,परांडा,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सरोदे,सरपंच श्री.हजारे, विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

 
Top