धाराशिव (प्रतिनिधी)- माता रमाईचा संघर्ष हा आर्थिक आणि शारीरिक त्यागाचे सर्वोच्च टोक आहे. तर माईसाहेबांच्या वाट्याला सामाजिक, मानसिक आणि शापित आयुष्याचा जो संघर्ष आला, तोही दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  या दोन्ही सहचारिनींनी जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या आपल्या पतीसाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. त्यामुळे या दोघींच्या वाट्याला आलेला संघर्ष वेगवेगळ्या टप्प्यांवरचा आणि वेगवेगळ्या स्वरूपाचा असला तरीही त्यातूनच दलित समाजाच्या आयुष्यात चांदणे फुलले असल्याचे प्रतिपादन कवी रवींद्र केसकर यांनी केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील भीमनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी कवी, व्याख्याते रवींद्र केसकर यांचे ‌‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील दोन सुवर्णपाने ः माता रमाई आणि माईसाहेब' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राजेंद्र निकाळजे उपस्थित होते. तर रोहन सोनवणे, कमलाकर बनसोडे, धनंजय सोनटक्के, अर्चना शिंगाडे, मिलींद डावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

पुढे बोलताना कवी केसकर म्हणाले की, दोन्ही सहचारिनींच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची अगणित उदाहरणे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रातून उलगडतात. रमाईबद्दल प्रचंड कळवळा बाळगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर यांच्यासाठी आपण काही करू शकलो नाही. म्हणून हळहळतात आणि या दोन्ही भावना त्यांच्या पत्रव्यवहारातून आपल्या सर्वांच्या समोर तो काळ आणि त्या काळातील घटना, घडामोडींचे अन्वयार्थ उलगडून दाखवतो. त्या काळाच्या टप्प्यावरील या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः आपल्या दोन्ही सहचारिनींना लिहिलेली पत्रे आपण मन लावून वाचल्यावर या दोन्ही सांस्कृतिक महामातांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी काय योगदान दिले, याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना विशाल शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन, आभार विशाल शिंगाडे यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास झेंडे, अविनाश शिंगाडे, सुमित चिलवंत, प्रसेजनजित शिंगाडे, यशवंत शिंगाडे, जितेंद्र बनसोडे, महेंद्र जेटीथोर, दिलीप सोनवणे, बंटी शिंगाडे, संतोष वाघमारे, विकी नाईकवाडी, प्रमोद ढवळे, प्रशांत कांबळे, सम्राट कांबळे, सम्राट वाघमारे, विजय उंबरे, प्रवीण सोनवणे, रणजित माळाळे, यश माळाळे, उमेश खंदारे, सुरेश देवकुळे, बापू साबळे, सारिपुत शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास भीमनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top