नळदुर्ग (प्रतिनिधी)-  शासनाने कुस्ती पट्टूंना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे मत माजी आमदार मधुकराव चव्हाण यांनी येथील महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने व येथील बालाघाट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. सदर कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी विविध वजन गटातुन विजयी झालेल्या मल्लांना माजी आमदार मधुकराव चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी तर प्रमुख उपस्थिती बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव लिबराज कोरेकर, संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण, कॅप्टन बागल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांची होती.

220 मल्लांनी आपापल्या कसरती व डावपेचांचा प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने जिंकली. तर 57, 61, 65, 70, 74, 78, 86 92, 97, 125 किलो वजनातून एकंदरीत 20 मल्लांनी सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. या यशस्वी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सुवर्ण पदक मिळवण्याऱ्यात दिगंबर पाटील, प्रांजल भरेतीया, शनिराज निंबाळकर, विपुल थोरात, आयेशान शेख, साहिल सय्यद, संदीप लटके, आदित्य कांबळे, अमोल दिंडे, रोहन पवार तर रौप्य पदक मिळविणाऱ्यात कृष्णा रक्ते, कौशिक शेख, युवराज वाघ, मनोहर मुंडे, मारूती शिंदे, जय जाधव, दयानंद घोगरे, संभाजी देवकर, उदयसिंह खांडेकर, विकास तावरे या मल्लांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ. संतोष पवार यांनी व आभार प्रा. डॉ. कपील सोनटक्के यांनी मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या जालना, बीड, धाराशिव व श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 71 महाविद्यालयातील कुस्ती पट्टूंनी सहभाग नोंदविला.

 
Top