भूम (प्रतिनिधी)-  शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 ऑक्टोबरच्या रात्री कुटुंब जेवणानंतर झोपले असताना आरोपींनी त्यांच्या दाराला कडी लावून घरावर दगडफेक केली. साधारण एक वाजता आरोपींनी घराबाहेरून या मुलीचे अपहरण केले आणि शेजारील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान, काही जण या मुलीला जबरदस्तीने उचलून नेत असल्याचे दोन महिलांनी पाहिले होते. थोड्याच वेळात मुलगी शेजारील शेतात अर्धवट कपड्यांमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. नंतर मुलीने शुद्धीवर आल्यानंतर आपबीती सांगितली. पीडित कुटुंबाने 112 वर कॉल करून पोलिसांना कळविले. त्यानंतर भूम पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. याप्रकरणी लाल्या गोवर्धन काळे, अमित गोवर्धन काळे, बापू लिंग्या काळे, लंग्या साहेब्या काळे, अशोक बाळू पवार यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून हे सर्व संशयित परंडा, जामखेड व अहिल्यानगर परिसरातील आहेत. याप्रकरणी घरफोडी, धमकी, शारीरिक हल्ला, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को), अत्याचार व लैंगिक छळ, अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमानुसार भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास शशिकांत तवर करीत आहेत.

 
Top