धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जमातीमध्ये काहीजण घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला विरोध करण्यासाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने नाशिक येथे 13 ऑक्टोंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आदिवासी पारधी समाजाबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गात आधीच 45 आदिवासी जमातींचा समावेश असताना काहीजण आणखी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का पोहचू नये याकरिता सर्व जमाती एकवटल्या आहेत. याकरिता नांदेड येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता नाशिक येथे 13 ऑक्टोंबर रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजाची एकजूट दाखविण्यासाठी जास्तीत जास्त आदिवासी पारधी समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काळे यांनी म्हटले आहे.