वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तांदुळवाडी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड संचलित शिवशक्ती सहकारी साखर कारखाना,वाशी,तालुका वाशी या कारखान्याचा गळीत हंगाम 2025_2026 चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शनिवारी (दि.11 ऑक्टोबर 2025) भैरवनाथ शुगर वर्क्स चे नवनिर्वाचित चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम उर्फ केशव सावंत यांच्या शुभहस्ते व शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाशीचे माजी संचालक अण्णासाहेब देशमुख,शिवाजीराव धुमाळ,बाबुराव घुले,विष्णू मुरकुटे तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सत्यवान गपाट शिवसेना तालुकाप्रमुख वाशी यांनी केले.
भैरवनाथ शुगरचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांनी बोलताना सांगितले की, तानाजीराव सावंत साहेब,महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार भूम परंडा वाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 11 वर्षापासून सतत या कारखान्याचे विक्रमी गाळप सुरू असून,प्रत्येक सभासदाच्या उसाला योग्य तो दर देऊन शेतकऱ्याचे समाधान गेली अकरा वर्ष सतत करीत आहोत.यावर्षी तीन लाख मे.टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट समोर आहे. ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडणार आहे.भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा निश्चय व्यक्त केलेला आहे.
त्याचबरोबर यावर्षी नरसिंह सहकारी साखर कारखाना इंदापूर,तालुका वाशी हा देखील गाळपासाठी सज्ज केलेला आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स ला आपला ऊस गळपासाठी देऊन सहकार्य करावे असे आवाहन भैरवनाथ शुगरचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
याप्रसंगी परिसरातील सभासद शेतकरी,तोडणी ठेकेदार,तसेच वाशी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते,कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख कर्मचारी,कामगार,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मांगले युवा सेना जिल्हाप्रमुख धाराशिव यांनी केले व उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केले.