नळदुर्ग (प्रतिनिधी)- येणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करून पूर्ण ताकदीनिशी नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे आता निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. 

नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर होताच अशोक जगदाळे यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अशोक जगदाळे हे नेमकी कोणती भूमिका घेणार आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी येणार याकडे सर्व शहरवासीय पाहत होते. त्यामुळे अशोक जगदाळे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी त्यांची पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका जाहीर केली आहे. सध्या तरी ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर मौन बाळगले असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सध्या ते सध्या ते इच्छुक नगरसेवकांच्या उमेदवारांची चाचपणी करीत असून सन 2016 च्या वेळी ज्या चुका उमेदवार निवडीच्या बाबतीत झाल्या होत्या. त्या चुका आता होणार नाहीत याकडे ते गांभीर्याने पाहत आहेत. पण ते शहरातील सर्वसमावेशक असे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडीवर भर देत असून येणारी नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवून पालिका जिंकून घेणार असल्याचे ठाम मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी त्यांनी विरोधकावर बोलताना म्हटले की, जे काही गेल्या चार वर्षांमध्ये प्रशासकीय काळामध्ये शहरांमध्ये विकास कामे झाले आहेत, त्यामध्ये राजकीय दबावाचा वापर करून ती विकास कामे काही जण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ जनतेचे हित न पाहता, आपले हित कसे साध्य होईल याकरिता शहराबाहेर वस्ती नसलेल्या ठिकाणी मोठमोठ्या रस्त्याची  कामे केली आहेत.  या ठिकाणी कोट्यावधी रुपये पाण्यासारखे खर्च करून याचा जनतेला कोणताच फायदा होत नाही, याशिवाय शहरातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळे जनतेचा कोणीही विचार करीत नसून नगर परिषद प्रशासनामध्ये विकास कामाच्या बाबतीत लुडबुड करणारे कांहीं नवीन पुढाऱ्यांचा उदय झाला आहे. त्यामुळे अशा राजकारण्यांना रोखण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी येणारी नगरपालिका निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढवून पालिका जिकणार असल्याचा ठाम विश्वास या वेली त्यांनी व्यक्त केला.

 
Top