तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे आलेल्या भाविका कलावती शिवाजी केदारी (रा. कोकलगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) यांची गर्दीत पिशवी हरवली होती. मंदिर परिसरात गस्त घालत असलेल्या सुरक्षारक्षक तुकाराम घोरपडे यांना ती पिशवी आढळून आली.
घोरपडे यांनी तत्काळ ती पिशवी दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर ओळख पटवून पिशवी संबंधित भाविक कलावती केदारी यांना परत देण्यात आली. त्या पिशवीमध्ये 19 हजार 677 रूपये रोख रक्कम होती. सुरक्षारक्षक तुकाराम घोरपडे यांच्या या प्रामाणिक आणि तत्पर कार्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे. या वेळी मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, फिल्ड ऑफिसर बिभीषण माने, सुरक्षा निरीक्षक अक्षय अनिल घुगे, सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.