तुळजापूर (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून मधप्यांचा सुळसुळाट वाढल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच डॉक्टर व कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या मधप्यांमुळे रुग्णालयाच्या शिस्तीला बाधा येत असून, त्यांच्यावर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र तुळजापूरात मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. त्यापैकी काही भाविक  येथे किरकोळ, उपचारासाठी येतात. तसेच काही संघटनांचे पदाधिकारी, मधपान करून रुग्णालयात रुबाब दाखवतात, तसेच दवाखान्यात गोंधळ घालतात. काहीजण तर किरकोळ जखम करून उपचारासाठी येतात. जेणेकरून आपली नशा लपवली जावी.

शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी अशाच प्रकारची घटना घडली. एका पक्षाच्या शहराध्यक्ष असल्याचे सांगत आलेल्या व्यक्तीने रुग्णालयात उपस्थित कर्मचारी व अन्य लोकांना हैराण केले. चौकशीअंती त्या व्यक्तीने मधपान केल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने अशा घटनेवर गंभीर भूमिका घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. “सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा मधप्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी होत आहे.  मधप्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम होत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

 
Top