भुम (प्रतिनिधी)- अमली पदार्थ तस्करीतील (ड्रग्ज) मुख्य आरोपी आणि गेल्या सहा महिन्यांपासून बार्शी व सोलापूर पोलिसांना गुंगारा देणारा फिरोज ऊर्फ मस्तान शेख (रा. परंडा) याला पकडण्यात परंडा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, या भागातील ड्रग्ज रॅकेटचा मुख्य पुरवठादार मस्तानला बेड्या पडल्याने पुढील साखळीत खळबळ उडाली आहे. मस्तान शेखला न्यायालयात उभे केले असता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
फिरोज ऊर्फ मस्तान शेख हा एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार होता. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सहायक पोलिस फौजदार गजानन मुळे आणि पोलिस अंमलदार राहुल खताळ हे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रुग्णालय परिसरातील गोल्डन चौक येथे त्यांना हा फरार आरोपी दिसला. बार्शी व सोलापूर पोलिस ठाण्यांत गुन्हा नोंद असलेला आणि अत्यंत चलाखीने पोलिसांपासून लपत असलेल्या मस्तानला पाहताच, फौजदार मुळे आणि अंमलदार खताळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. अत्यंत शिताफीने फिरोज ऊर्फ मस्तान यास अटक करून परंडा पोलिस ठाण्यात आणले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळी आरोपीला सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार
मस्तान शेख हा अमली पदार्थ तस्करीतील मुख्य आरोपी असून, तो इतर राज्यांतून ड्रग्ज आणून परंडा येथून इतर पेडलर्स व किरकोळमध्ये विक्री करत असल्याची माहिती आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाकणीजवळ झालेल्या 18 ग्रॅम ड्रग्ज कारवाईत मस्तानचे नाव मुख्य आरोपी आणि मुख्य पुरवठादार म्हणून निष्पन्न झाले होते. बार्शी येथील गुन्ह्यात फरार असतानाही त्याने ड्रग्ज तस्करी सुरूच ठेवली होती.