धाराशिव (प्रतिनिधी)-  एका टप्प्यावर शालेय अभ्यासक्रमात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव आणि आपल्यासारख्या साहित्यीकांना अभ्यास मंडळाने सन्मानपूर्वक स्थान दिले. अभिजन सन्मुख असलेला अभ्यासक्रम या अभ्यास मंडळामुळे बहुजन सन्मुख झाला. त्यात भास्कर शेळके यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत प्रख्यात साहित्यीक इंद्रजित भालेराव यांनी शेळके लिखित अजुनि चालतोची वाट या आत्मकथन प्रकाशन सोहळ्यात गौरवोद्गार काढले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने ज्येष्ठ लेखक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त भास्कर शेळके यांच्या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख उपस्थित होते. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, प्रभारी प्राचार्य डॉ. संदिप देशमुख, मसाप शाखा अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भालेराव यांनी आत्मचरित्र हा लोकशाहीवादी वाडमय प्रकार आहे. आत्मचरित्र लिहिणे हे जेवढे सोपे आहे, तेवढेच अवघडही आहे. या आत्मकथनात भास्कर शेळके यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडून दाखवले आहे. यात संपूर्ण गावगाडा आहे. हजारो वर्षांची भाषा आणि हजारो वर्षांचे अनुभवातून आलेले ज्ञान यात पानोपानी पहायला मिळते असे भालेराव यांनी सांगितले.

यावेळी लेखक भा. न. शेळके यांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत असताना लेखनामागील प्रेरणा आणि प्रवास उपस्थितांसमोर मांडला. एम. डी. देशमुख, आमदार विक्रम काळे, प्राचार्य देशमुख यांनीही यावेळी मनोगतपर शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक प्रा. अरविंद हंगरगेकर यांनी तर आभार बालाजी तांबे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र केसकर यांनी केले. यावेळी शहर आणि परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top