उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील गोंधळवाडा येथील श्री क्षेत्र रेणुका देवीची पालखी-छबीना मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ढोल, पोत व हलगीच्या ठेका धरत आराधी महिला व भक्त भाविकांच्या उपस्थित बुधवारी दि.1 ऑक्टोबर पहाटे उत्साहात काढण्यात आली.
शहरातील गोंधळीवाडा येथील श्री रेणुका देवीच्या मंदिरात गेल्या आठ दिवसापासून घटस्थापना आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता रेणुका देवी मंदिरापासून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी पहाटे श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अरुण इगवे यांच्या हस्ते श्री रेणुका देवींचे पूजन व आरती करण्यात आली त्यानंतर देवी मंदिरात घटाची विधिवत पूजन करून घट हलविण्यात आले. मंदिराचे सचिव संजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीच्या पालखीचे पुजन व आरती करण्यात आली.
गोंधळवाडा श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिरापासून पारंपरिक वाद्यासह संबळ, तुणतुणे, धनगरी ढोल, हलगी, तुतारी, बँडबाजा, ढोल-ताशा आदीं संगीतमय उत्साही वातावरणात छबिना व पालखी काढण्यात आली. पहाटेचे सुमारास फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. देवीच्या पालखीसमोर आराध्यांचा मेळा पोत घेऊन नाचत होता. तर पाठीमागून डोक्यावर कलश व हातात आरतीचे ताट घेऊन महिला भाविकांच्या येण्यामुळे पालखी सोहळा दिमाखदार दिसत होता.
श्री रेणुकादेवी मंदिर नवरात्र महोत्सव यशस्वी उत्साहात होण्यासाठी देवी मंडळ अध्यक्ष अरुण ईगवे, सचिव संजय चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश साळुंके, कार्याध्यक्ष सुरेशराव उबाळे, कोषाध्यक्ष रामलिंग घोगरे, सहसचिव प्रल्हाद घोगरे, मंदिराचे पुजारी माधव पांचगे, समिती सल्लागार राजेंद्र साळुंके, विक्रम पाचंगे, गणेश गरुड,अभय रेणके, किसनराव घोगरे, रुक्मण्णा चव्हाण, नर्सिंग गरड आदींनी परिश्रम घेतले.