तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवांतर्गत दररोज विविध कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत सोमवारी 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर बासरी वादनाचा मनमोहक कार्यक्रम संपन्न झाला.

स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर संस्थानने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या निमित्ताने बासरी संस्कार विद्यालयाचे जगदीश सुतार यांनी रसिक मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन सादर केले.तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद,धाराशिवचे विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी दिंडी लोकनाट्य आणि भारुड यांचे देखणे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.या प्रसंगी विशेष उपक्रम म्हणून स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला.भूम तालुक्यातील गणेगाव येथील वैशाली जाधव यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा,कवड्याची माळ, महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वैशाली जाधव यांनी लघुउद्योग उभारून आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून दिला असून,एकल महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंदिर संस्थानने त्यांना सन्मानित केले.तसेच कार्यक्रमात योगदान दिल्याबद्दल जगदीश सुतार आणि विशाल शिंगाडे यांचाही सन्मान मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top