उमरगा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा उमरगा तालुक्यातील पेठसांगवी, नारंगवाडी, औराद आणि कुन्हाळी गावातील नुकसानीची पाहणी दौरा केला. या दौऱ्यांनंतर शासकीय विश्रामगृह उमरगा येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी टंचाई काळातील सर्व सवलती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागू केल्या जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, या संकटाच्या काळात बँकांना कर्जवसुली थांबवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या बँक व्यवस्थापकांवर कठोर कारवाई केली जाईल. याचबरोबर, वीजबिलाची सक्तीने वसुली करू नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
शेतीच्या नुकसानीबाबत सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता, शंभर टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे गृहीत धरून पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जेणेकरून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळू शकणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, त्यांनाही मदत मिळावी यासाठी आपला शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
यावेळी माजी जिप अध्यक्ष नेताजी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी सभापती अभय चालुक्य, राहुल पाटील, शहाजी पाटील, माधव पवार लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, प्रशांत माने, विठ्ठल चिकूंद्रे, सुशीलकुमार शिंदे, साईराज टाचले, समर्थ दंडगे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणार
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, त्यांच्यासाठी विशेष मदतीची योजना आखली जात आहे. जमिनीची दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने, शासनाचे अनुदान, रोजगार हमी योजना आणि इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने हा खर्च उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच, पावसामुळे खराब झालेले रस्ते, वाहून गेलेले पूल आणि बंधाऱ्यांच्या नुकसानीची माहिती जमा केली जात असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.
