वाशी (प्रतिनिधी)येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम,ग्रंथपाल प्रा.राहुल कुलकर्णी, ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा.डॉ.रवी चव्हाण,प्रा.महादेव उंद्रे,कार्यालय अधीक्षक मोहन डोलारे,मुख्य लिपिक शिवाजी साळुंखे उपस्थित होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या शुभहस्ते डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की,माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून तसेच जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरी करत असतो. डॉ.कलाम यांचे व्यक्तिमत्व म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे होते. संशोधन साहित्य या विभागामध्ये त्यांचे कार्य मोठे आहे.त्यांना मानाचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतरही त्याचे त्यांना विशेष वाटले नाही यावरूनच ते किती साधे होते हे आपणास दिसून येते.भारत देशाला महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची प्रचंड आवड असल्यामुळेच अखेरच्या श्वासापर्यंत ते काम करत राहिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम. डी. उंद्रे यांनी तर आभार क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवी चव्हाण यांनी मानले. यावेळी सूर्यकांत धोत्रे,तुषार कवडे,कुमारी रवीना जगदाळे, दत्ता फुले व ग्रंथालय परिचर प्रविण बारगजे उपस्थित होते.