धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकात आज पहाटे मोठी दुर्घटना टळली. चालक-वाहक विश्रांती कक्षातील पीव्हीसी पॅनल सिलिंग पहाटे पावणे चारच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे बस स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांती कक्षात सुमारे 30 ते 40 चालक व वाहक मुक्कामाला होते. मध्यरात्री कक्षात पाणी गळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील चालक-वाहक दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपले. काही वेळातच तेथील वरचा सिलिंग भाग कोसळला. जर चालक-वाहक त्याच ठिकाणी झोपले असते, तर मोठी जीवितहानी घडली असती. घटनेनंतर बस स्थानकात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, धाराशिवचे नवीन बस स्थानक हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बस स्थानक अद्याप पूर्ण झालेले नाही. काम अपूर्ण असतानाही 1 मे रोजी परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला पाच महिने उलटून गेले तरी बांधकामातील त्रुटी, पाणी गळती आणि दर्जाहीन साहित्याच्या वापराच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

“10 कोटींच्या कामात एवढ्या लवकर सिलिंग कोसळणे म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा परिणाम” असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. संबंधित ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा धाराशिव बस स्थानकाच्या बांधकामातील अनियमितता आणि निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


 
Top