धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अलीकडच्या मुसळधार पावसामुळे परांडा तालुक्यातील देवगाव,वडनेर, वागेगव्हाण व लाहोरा या गावांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली.या पुराच्या पाण्यात घरे, गुरेढोरे, शाळा तसेच विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे साहित्य वाहून गेले. गावोगाव दुःखाचे सावट पसरले होते.

अशा कठीण प्रसंगी जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुढे आला व त्यांनी बाधितांना मदतीचा हात दिला.याच पार्श्वभूमीवर,समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) मनेश खंडागळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,‌‘टच  टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प' (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला.

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्यासाठी व त्यांच्या शिक्षणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी 386 विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने युक्त ‌‘स्कूल किट' वाटप करण्यात आले.या वेळी ‌‘टच' संस्थेचे उमाकांत पांचाळ व सहकाऱ्यांनी लाभार्थी मुलांशी थेट संवाद साधून त्यांना आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीनं शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. हा उपक्रम कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज मोटे, टच बालग्राम संस्थेचे विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम डोलारे आणि महारुद्र नक्षे यांच्या सहकार्याने पार पडला. या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवे बळ, आत्मविश्वास आणि आशेची नवी किरण मिळाली. हे केवळ शालेय किटचे वाटप नसून त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी उभारलेला एक दृढ विश्वासाचा पूल ठरला आहे.

 
Top