धाराशिव (प्रतिनिधी) - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे. ते आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटी ब असे स्वतंत्र आरक्षण देऊन आम्हाला हक्काच्या आरक्षणामध्ये सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गोर बंजारा समाजातील युवक, युवती, महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या टोपीवर जै बंजारा, जै सेवालाल, एकच मिशन एसटी आरक्षण तर एकच लाल सेवालाल, एसटी आरक्षण आमच्या हक्काचे आदींसह विविध घोषवाक्य लिहिलेले बॅनर प्रत्येकांनी हातामध्ये घेत प्रचंड घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. तसेच संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा असलेला पांढरा ध्वज या मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले. विशेष म्हणजे पांढरे वादळ सकाळी 11 वाजल्यापासून शहरात गोंगावत होते. ते वादळ दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट सभेला संबोधित केल्यानंतर शांत झाले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून दिवाळीपूर्वी आरक्षणाची मागणी मान्य करा. अन्यथा गोर बंजारा समाज दिवाळी मुंबईत पाट व बकरी घेऊन येऊन साजरी करत सरकारला सळोकी पळून करून सोडणार असल्याचा थेट सज्जड दम वजा इशारा मार्गदर्शन करताना नेत्यांनी सरकारला दिला.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली सेंट्रल प्रोव्हुन्से सर (CP) बेरार, नागपूर (MP) च्या शिफारशी समवेत हैदराबादचे गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून वसंतराव नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्या. बापट व अन्य आयोगांचे या जमाती संविधानाच्या अनुच्छेद 342 (2) नुसार अधिसूचित जमाती प्रवर्गामध्ये गोर बंजारा जमातीचा समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबत नमूद केलेले आहे. तर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.8.2.2016, 13.2.2019, 8.12.2020, 22.12.2020, 7.2. 2023 व लक्षचंडी यज्ञ, पोहरादेवी दि.1.4 2017, नंगारा संग्रहालय पोहरादेवी भूमिपूजन कार्यक्रमात दि.3.12.2018 व 12.2.2023 रोजी दिलेले आश्वासन. तसेच हिंदू बंजारा कुंभ कार्यक्रम दि.30.9.2023 व प्रधानमंत्री नंगारा लोकार्पण कार्यक्रम दि.5.10.2024 या दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बैठक आयोजित करून त्या सोडविण्यास हा प्रयत्न केला गेला मात्र अध्यापित या प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील गोर बंजारा जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा जमात ही विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषय जगत आहे. ते राहत असलेल्या तांड्यात कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्यामुळे तांडेच्या तांडे विकसित नसल्याने ते शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे तांडे ओस पडत आहेत. तसेच 1931 च्या जनगणने वेळी बंजारा तत्सम विमुक्त व भटक्या जमाती 1971 कायद्याने बाधित असल्याने त्यांची सर्वंकष नोंद न झाल्याने पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना मिळाले नाही. सरकारपर्यंत त्यांचा आवाज आज पर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या नावान प्रवर्गात धर्मात आणि राज्यात विभागले गेले. विशेष म्हणजे राष्ट्रीय डी.एन.टी. व एस.टी. आयोग यांच्या प्रसिद्ध सर्व अहवाल व शिफारस मध्ये गोर बंजारा जमातीस अनुसूचित जमाती किंवा जातीत समावेश करण्याच्या अनेक वेळा शिफारशी केलेले आहेत. या जमाती आदिवासी पेक्षाही हलाखीचे जीवन जगत असून त्यांचे जीवनमान उंचावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ लागू करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी दुपारी 12 वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 2 वाजण्याच्या सुमारास धडकला. मोर्चा धडकल्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चा कार्यास आमदार राजाभाऊ राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, प्रा ज्योती प्रकाश चव्हाण, अपेक्षा जाधव, प्रा लक्ष्मण चव्हाण, विजय नायक, मोहन राठोड, सुरेश पवार, बाबू राठोड, माजी सभापती प्रकाश चव्हाण, हरिभाऊ जाधव, दिलीप जाधव ,राजाभाऊ राठोड, ऍड राजाभाऊ पवार, शहाजी चव्हाण, बालाजी राठोड, कालिदास चव्हाण, विजय राठोड, वैभव जाधव, जगन्नाथ चव्हाण, योगेश राठोड, संतोष चव्हाण, अविनाश चव्हाण, यशवंत चव्हाण, मोहन राठोड, प्रताप राठोड, शिवाजी राठोड, सचिन जाधव, विलास राठोड, अमृता चव्हाण, वसंत पवार, अतुल राठोड आदींनी संबोधित केले. यावेळी सरकारला धारेवर धरीत दिवाळीपूर्वी बंजारा समाजाला आदिवासींच्या 7 टक्के आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र अनुसूचित जमाती (ब) प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे. जर सरकारने आरक्षण नाही दिले तर हा समाज ऊस तोडायला कोयते घेऊन जाण्याऐवजी कोयते, काळी पाट व बकरे घेऊन मुंबईत येईल आणि त्यानंतर सरकारला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नेत्यांनी दिला.
हा मोर्चा बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या हातात एकच मिशन एसटी आरक्षण, एकच लाल सेवालाल, वन नरेश, वन आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदींसह विविध घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण परिसर मोर्चेकर यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. मोर्चा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समाजाच्यावतीने खास स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व अल्पोपाराची देखील सुविधा उपलब्ध केली होती. स्वयंसेवकांनी व्यवस्थित नियोजन केल्यामुळे मोर्चात सहभागी झालेले युवक युवती महिला व पुरुषांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही किंवा कुठल्याही प्रकारची गैरसोय निर्माण झाली नाही.