धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्याचे अर्थात धाराशिवचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण प्रा. एस.एल भैरप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव यांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक करताना युवराज नळे यांनी प्रा. भास्कर चंदनशिव आणि पद्मविभूषण प्रा. एस. एल भैरप्पा यांच्या साहित्यिक कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत, श्रद्धांजली सभेची भुमिका विशद केली.
प्रास्ताविकानंतर दोन मिनीटे मौन पाळत, दिवंगत साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव आणि पद्मविभूषण प्रा. एस. एल भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी, प्रा. भास्कर चंदनशिव यांचे सहाध्यायी मित्र प्रा.भा.न. शेळके यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणी सांगितल्या. प्रा.चंदनशिव यांची शेती-मातीशी असलेली निष्ठा, तसेच ग्रामीण आणि दलित साहित्य यातील दरी सांधण्यात त्यांनी दिलेलं योगदान यावरही भा. न. शेळके यांनी भाष्य केले. प्रा. चंदनशिव सरांची जडण-घडण, त्यांच्या प्राध्यापकीय जीवनातील चढ-उतार, तसेच ग्रामीण साहित्याबद्दल त्यांची आस्था, ग्रामीण भाषेतील, बोलीतील शब्दांवर त्यांची असलेली पकड याही गोष्टींचा विमर्श घेत, भा. न. शेळके यांनी त्यांच्या मित्राबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
त्याचप्रमाणे, पद्मविभूषण प्रा.एस. एल भैरप्पा यांच्या साहित्यिक रचनांचं वेगळेपण, वैशिष्ट्ये आणि त्यांच्या साहित्यातून व्यक्त झालेलं समाजभान यावर प्राचार्य प्रशांत चौधरी यांनी समर्पक शब्दांत त्यांच्या साहित्यिक कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना मुल्याधिष्ठित आणि तात्त्विक भुमिकेचं महत्त्व, एका लेखकाच्या परिप्रेक्ष्यातून जपत, बदलत्या-टोकदार सामाजिक जाणिवांना भिडून भैरप्पांनी कसं जपलं हे प्रा. प्रशांत चौधरी यांनी प्रा.एस. एल भैरप्पा यांच्या साहित्यिक कृतींचा जागर करत श्रद्धांजली वाहिली. धाराशिव येथील प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक श्री. राजेंद्र अत्रे, कथालेखक श्री. रविंद्र शिंदे, प्रा.समाधान शिकेतोड, प्रा डॉ कृष्णा तेरकर, प्रा डॉ सहदेव रसाळ, प्रा प्रशांत गुरव यांनीही यावेळी शब्दांजली अर्पण केली.
सदर श्रद्धांजली सभा साहित्य भारती, धाराशिव आणि अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था यांच्या वतीनं, साहित्य भारतीचे प्रांत मंत्री युवराज नळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. सुत्रसंचलन हनुमंत पडवळ, आणि आभार प्रदर्शन प्रा. रुपेश कुमार जावळे यांनी केले. याप्रसंगी, धाराशिव येथील कवी श्री. मधूकर हुजरे, मुकुंद राजेनिंबाळकर, ॲड वैभव अत्रे, धाराशिव नगर परिषदेच्या शहर उपजिवीका कृती आराखडा समितीचे मानद सदस्य श्री. गणेश वाघमारे, ज्येष्ठ नागरिक श्री. सुरेश शेळके, मोहन शेवाळे, कृष्णा साळुंके, अविनाश मुंडे, रणजित गायकवाड यांच्यासह साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.