तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकप्रिय मराठी मालिकेत महाराणी येसूबाई ही प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली.
या प्रसंगी प्राजक्ता गायकवाड यांनी मातेच्या चरणी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडे घातले. त्या म्हणाल्या, “मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आर्थिक व मानसिक आधाराने उभे राहिले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनीही धैर्य सोडू नये, नव्या उमेदीनं पुन्हा शेतीकडे वळावे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच त्यांनी पुढे मातेच्या चरणी साकडे घालत म्हटले,“आई, शेतकऱ्यांवर अशी पूरस्थिती पुन्हा येऊ देऊ नकोस. हे सर्व शेतकरी तुझीच लेकरं आहेत. त्यांच्या दुःखाचा तू अंत कर आणि त्यांना या संकटावर मात करण्याची शक्ती दे,” अशी त्यांनी प्रार्थना केली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी शेवटी सांगितले,“शेतकरी हे या मातीतले खरे हिरो आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, हीच माझी मातेच्या चरणी प्रार्थना आहे.”
या वेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे मंदिर संस्थानतर्फे महंत वाकोजी बुवा, कौटुंबिक स्नेही रोहित पडवळ, आकाश मुंडे, श्रीनाथ पडवळ, किरण शेटे, सचिन क्षीरसागर तसेच पी.आर.ओ. देशपांडे साहेब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांना देवीचे प्रसादरूप वस्त्र आणि श्रीफळ देण्यात आले.