धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटीमध्ये 34 लाख 60 हजार 860 रूपये व 2 किलो 722 ग्रॅमच्या सोन्याची दागिने असे मिळून 2 कोटी 13 लाख 19 हजार 703 रूपयांची चोरी 3 ऑगस्ट 2025 रोजी झाली होती. या प्रकरणात आरोपीने कोणतेही पुरावे मागे न ठेवल्यामुळे धाराशिव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सदर प्रकरण अतिशय कुशलतेने हाताळून या प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेतील कार्यरत असणारा शिपाई दत्ता नागनाथ कांबळे यास नागपूर येथून अटक केली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पोलिस मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार उपस्थित होते. अधिक माहिती देताना पोलिस अधीक्षक खोखर यांनी सांगितले की, आरोपीचा शोध लागणे कठीण झाले होते. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या टीममध्ये विभागणी करून तपास सुरू केला होता. या दरम्यानच्या काळात तांत्रिक माहितीचे विश्लेषन व उपलब्ध सीसीटीव्हीच्या तपासणीवरून सदरील चोरी लोकमंगल शाखेतील शिपाई दत्ता नागनाथ कांबळे याने केला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची दागिणे हस्तगत करणे अत्यंत आव्हानात्मक होवून बसले होते. दत्ता हा उच्च शिक्षित असल्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी त्याने योग्य नियोजन करून गुन्हा केला होता. त्यामुळे आरोपी मुद्देमालासह पकडणे अवघड झाले होते.  कारण आरोपी हा दुसऱ्याच्या आधार कार्ड व सिमकार्ड वापरून जागा बदलत फिरत होता. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होणे अवघड होत होते. स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन महिन्याच्या अथक प्रयत्नांनी दत्ता कांबळे हा नागपूर येथे लपून बसल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून दत्ता कांबळे यास नागपूर येथून ताब्यात घेतले. 

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस निरीक्षक अनिल मांजरे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलिस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलिस अंमलदार बबन जाधवर, चालक मेहबुब अरब, प्रकाश बोईनवाड, सुभाष चौरे यांच्या पथकाने केली. 


11 लाख व 2 किलो 159  ग्रॅम सोने जप्त

यावेळी दत्ता कांबळे यास ताब्यात घेतल्यानंतर लोकमंगलचे चोरीस गेलेल्या पैशापैकी 11 लाख रूपये रोख व 2 किलो 159 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. दत्ता कांबळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलिस कोठडी त्यास देण्यात आली आहे. 


 
Top