धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुरग्रस्त भागातील बाधित नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या भावनेतून छोटीशी मदत केली आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत आज (दि. १८ ऑक्टोबर) कळंब तालुक्यातील हळदगाव येथे १४० शिधा किटचे वाटप करण्यात आले.

ही मदत किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या प्रेरणेने तसेच माया माने, तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या किटमध्ये दैनंदिन वापरातील १७ जीवनावश्यक वस्तू — डाळी, साखर, रवा, गूळ, गोडेतेल, चहा पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, लाल तिखट, मसाले आदी किराणा साहित्याचा समावेश आहे.

शासनाच्या निर्णयानुसार मंदिर संस्थानमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ऑक्टोबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याशिवायही सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अतिरिक्त एक दिवसाचे वेतन स्वखर्चाने गोळा करून पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अर्पण केले आहे. ही मदत त्यांनी आई तुळजाभवानीच्या सेवेसमान समजून केली आहे. या मदत वितरणावेळी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप धमाले, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी, रवींद्र गायकवाड, कृृष्णा डोलारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा हा उपक्रम सामाजिक जाणिवेचा उत्तम आदर्श ठरला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना आधार मिळाला आहे.

 
Top