कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदार याद्यांवरून प्रचंड वादंग उभा राहिला आहे. माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी थेट प्रशासनावरच निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. “एका विशिष्ट राजकीय पक्षाला जिंकवण्यासाठी बाह्य आणि बोगस  मतदारांची पद्धतशीर नोंदणी करण्यात आली आहे, असा गंभीर दावा करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले की, नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये 200 हून अधिक मतदारांची नावे बदलून इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे नेमके कोणाच्या दबावाखाली करण्यात आले? प्रशासन लोकशाहीची थट्टा करत आहे का?  असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या तयार करताना निवडणूक आयोगाच्या नावाखाली मनमानी सुरू असून, प्रशासन विशिष्ट ‌‘यंत्रणे'च्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा थेट आरोप मुंदडा यांनी केला. यावेळी नदकिशोर हौसलमल, गोविंद चौधरी, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.  कळंबच्या राजकारणात आता निवडणुकीपेक्षा मतदारयादीचाच गाजावाजा सुरू आहे. मुंदडांच्या या आरोपांमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर प्रशासनाने मौन बाळगल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.


हरकतींवर दुर्लक्ष, नियमांची पायमल्ली

मतदार याद्यांवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी दोन नियम आहेत. स्वतः मतदाराचा अर्ज आणि इतरांनी केलेला आक्षेप. पण मुख्याधिकारी मंजुषा गुरमे आणि निवडणूक विभागातील काकडे यांनी दुसरा नियम पायदळी तुडवत स्वतः या आणि हरकती नोंदवा असा अजब नियम राबवला आहे. अशी तिखट टीका मुंदडा यांनी केली.


बोगस नावे काढली नाहीत तर थेट न्यायालयात

मुंदडा म्हणाले, जर बोगस नावे आणि फेरफार केलेले मतदार तातडीने वगळले नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागणार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी हा संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढवू.”


लोकशाहीवर थेट हल्ला

प्रभागात फेरफार झालेल्या मतदार याद्यांमुळे खरे मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा गंभीर इशारा मुंदडा यांनी दिला. “प्रशासनाने मतदारांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो लोकशाहीवर थेट हल्ला ठरेल. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या बनावट मतदार यादी विरोधात लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.

 
Top