भूम (प्रतिनिधी)-  तालुका फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्या द्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनास असे म्हटले आहे की, फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर नमूद केलेल्या मजकुरानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत. तसेच तत्कालीन पोलीस अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करुनही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे महिलांसंबंधातील गुन्हे रोखण्याची आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारी बाब आहे.तसेच, सदरहू प्रकरणात संबंधित आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार व त्यांचे स्वीय सहायक पदावर असलेले स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आली आहे. अशी तक्रार करण्यात आली आहे. 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे, जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद, ज्योती आडागळे भूम शहर प्रमूख, ललिता सावंत उपजिल्हा प्रमूख, मिनाताई कांबळे तुळजापूर शहरप्रमूख यांच्या सह महिला उपस्थित होत्या.


 
Top