धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना पत्राद्वारे सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा आयोजित करून आपल्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा, तसेच दुरुस्तीकरिता आवश्यक कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून तसा ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी केली आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी आमदार पाटील यांना मंगळवारी ग्रामसभा घेण्याबाबत सूचना देणार असल्याचे म्हटले आहे.यासोबतच ग्रामसभेत नुकसानीचे केलेल्या पंचनाम्याचे चावडीवर वाचन करण्याची मागणी केली आहे,जेणेकरून सर्व ग्रामस्थांना नुकसानीचा व पुढील कामकाजाचा पारदर्शक आढावा घेता येईल.
अतिवृष्टीमुळे गावागावातील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रत्येक गावाने आपले प्रस्ताव प्राधान्यक्रमानुसार सादर करणे गरजेचे आहे.नुकसानीचे पंचनाम्याचे जाहीर वाचन केल्यास या प्रक्रियेत पारदर्शकता राहील.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी तातडीने ग्रामसभा घेऊन आवश्यक ठराव मंजूर करावेत व जिल्हा प्रशासनाला पाठवावेत असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.