भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील साडेसांगवी येथे प्रशासन व शेतकरी यांच्यातील तणाव पुन्हा उफाळला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांच्या याद्या दाखवण्याच्या मागणीवरून ग्रामसेवक व शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बालाजी देवकते हे आपल्या घराच्या पडझडीबाबत पंचनाम्याची यादी पाहण्यासाठी पंचायत समिती, भूम येथे आले होते. त्यावेळी साडेसांगवी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक पवार यांना त्यांनी संबंधित यादी दाखवण्याची विनंती केली. या साध्या मागणीवर ग्रामसेवक भडकले व “तुमच्या गावाला घोडा लावतो” अशा अशोभनीय भाषेचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रसंगाचा व्हिडीओ शेतकऱ्याने मोबाईलवर रेकॉर्ड केला. याचाच राग मनात धरून ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या आवारातच शेतकऱ्यावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असताना अधिकारीच शेतकऱ्यांवर हात उचलण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
शेतकरी पुत्र भगवान बांगर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, “अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे,” अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे दिवसभर पंचायत समितीच्या आवारात तीव्र चर्चेला ऊत आला होता.