धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा महाविद्यालय, धाराशिव येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात  प्रमुख वक्ते  प्रा. राजा जगताप (मराठी विभाग प्रमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव ) यांनी “मराठी भाषा: प्राचीनत्व व वर्तमान परिस्थिती” या विषयावर बोतलतांना पुस्तके मस्तकं घडवतात ,अनुभव देतात,साहित्य वाचनातूनच वेगवेगळे अनुभव मिळतात त्यासाठी व मराठीचे संवर्धन करण्यासाठी वाचन संस्कृती वाढवावी असे प्रतिपादन  केले आहे. अत्यंत सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वल करून करण्यात आली. अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले.

 प्रा. राजा जगताप पुढे बोलताना म्हणाले की, मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास अफाट आहे.  मराठी भाषेला  वैभवशाली परंपरा आहे. केवळ भाषा संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, अस्मितेची व इतिहासाची वाहक आहे." तसेच, सध्याच्या काळात मराठी भाषेला भेडसावणाऱ्या समस्यांवरही त्यांनी भाष्य केले. इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मराठी भाषेचे अवमूल्यन होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मराठी भाषेचा सातत्याने वापर करण्याचे आवाहन केले आणि डिजिटल माध्यमांतही मराठीतून अधिक संवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. मोरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य,डॉ. मोरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या अभिमानासाठी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे 

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. अविनाश ताटे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी जे निकष लागतात याची सविस्तर माहिती दिली.प्रमुख उपस्थितीमध्ये क्रीडा विभाग प्रमुख, डॉ. चंद्रजीत जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. अनघा तोडकरी, मराठी विभाग प्रमुख , डॉ. तुळशीराम उकिरडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनीषा जांगीड हिने केले, तर आभार  कुमारी गायत्री जांगीड हिने मानले. या कार्यक्रमात  विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 
Top