धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा माध्यमिक (पोस्ट बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर सुवर्णा दिलीपसिंग राजपूत यांनी वेतनासाठी ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याचा आरोप होत होता. अखेर आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी या महिलेची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. तब्बल तासभर त्याच ठिकाणी स्वतः थांबून यंत्रणा कामाला लावली. थेट जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांना उपोषण स्थळी बोलावून घेतले. गेल्या आठ दिवसापासून चालू असलेले उपोषण महिलेला प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर एक तासात हे उपोषण मागे घेण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांची संत गाडगेबाबा माध्यमिक (पोस्ट बेसिक) आश्रम शाळा असून त्या शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णा दिलीपसिंग राजपूत या महिला कर्मचाऱ्यास वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राजपूत यांनी सोलापूर येथील पिठासीन अधिकारी शाळा न्यायधीकरण यांच्याकडे धाव घेतली होती. त्या न्यायालयाने दि.16 एप्रिल 2025 रोजी राजपूत यांच्यासारखा अंतिम आदेश दिले आहेत. तर धाराशिव जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांनी वेतन देण्यात यावे असे पत्र दिलेले आहे. तसेच लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी देखील पत्र देऊन वेतन देण्यात यावे असे नमूद केले आहे. मात्र, संस्थेच्यावतीने याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजपूत यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार कैलास पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व हकीकत जाणून घेतले. त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी बोलावून घेत राजपूत यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काळे यांनी राजपूत यांना लेखी पत्र दिले. या लेखी आश्वासनानंतर राजपूत यांनी उपोषण स्थगित केले आहे.
