तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा येथे गुत्तेदार आणि जीवन प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काम अपूर्ण असतानाच लाखोंची बिले उचलल्याचे चौकशीत समोर आले असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आपसिंगा प्रमाणेच काक्रंबा गावाचा योजनेचीतपासणी करण्याची मागणी होत आहे काक्रंबा सरपंचाने या प्रकरणी तक्रार केली आहे.

दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता चौकशी अधिकारी येणार होते. मात्र ते प्रत्यक्षात 3 वाजता दाखल झाल्याने प्रक्रिया उशिरा सुरू झाली. यावेळी काही अधिकारी गैरहजर राहिल्याने चौकशी अर्धवट व अपूर्ण राहिल्याची चर्चा रंगली. गावात दाखवले गेलेले काम पाहता अनेक ठिकाणी पाईपलाईन उघड्यावर दिसून आली, तर काही ठिकाणी ती थेट नाल्यात टाकलेली आढळली. शिवाय कमी खोलीवर लाइन पुरल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. संपूर्ण कामाचे जिओ टॅग फोटोही चौकशीदरम्यान काढण्यात आले. पुढे पाण्याच्या टाकी व फिल्टर हाऊस परिसरात पाहणी करताना लोखंडी पाईप जोडण्याचे व बांधकामाचे काम अद्याप सुरू असल्याचे दिसले. मात्र, हेच काम कागदोपत्री पूर्ण दाखवून शासनाकडून देयक उचलले असल्याचा ठपका तक्रारदारांनी ठेवला. 


गावकऱ्यांची उत्सुकता, कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?

या चौकशीमधून मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होणार की पुन्हा प्रकरण झाकले जाणार, याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.

 
Top