धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त धाराशिव शहरात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीने रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाखांमधील सुमारे 300 स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला. तर 350 हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. स्वयंसेवकांच्या एकसंध आणि शिस्तबद्ध पथसंचलनाने शहरात अनुशासन, देशभक्ती आणि संघकार्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. दरम्यान पथसंचलनाची सुरुवात शासकीय अध्यापक (डाएट कॉलेज) विद्यालय, बार्शी नाका येथून झाली. येथून जिजामाता चौक, काळा मारुती चौक, आठवडी बाजार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे समता कॉलनीतील परिमल मंगल कार्यालयात पथसंचलनाचा समारोप झाला. 

स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थित नागरिकांवर देशभक्ती आणि संघटित शक्तीचे दर्शन झाले. तसेच पथसंचलनानंतर परिमल मंगल कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात स्वयंसेवकांनी योगासने, कवायती आणि सूर्यनमस्कार यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका प्रतिभा सतिश मोदानी, तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ.जयंतीभाई भाडेसिया उपस्थित होते. 


 
Top