धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रामुख्याने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि साहित्यिक, सांस्कृतिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा. विद्या देशमुख यांना छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदरचा शिक्षक रत्न पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, संमेलन अध्यक्ष संतोष नारायणकर, विजया गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत दानगुडे,किशोर टिळेकर, दत्तात्रय भोंगळे आदी सन्माननीय अतिथींच्या हस्ते देण्यात आला. प्रा.विद्या देशमुख यांचा कवितासंग्रह प्रकाशित असून, गझल, कविता, कथाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे.
तसेच अध्यापनाच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या यशाबद्दल धाराशिव आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.