नळदुर्ग (प्रतिनिधी)-  उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यावर जर हल्ले होत असतील तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच भाषेत जमिनीत गाढण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी लागेल. तरच शेतकऱ्यावर कोणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचा दर ठरल्याशिवाय कोणीही कारखान्याला ऊस घालण्याची गडबड करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शहापूर तालुका तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषद मेळाव्यात केले. 

शहापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार राजू शेट्टी हे बोलत होते.  यावेळी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय रणदिवे, धाराशीचे अध्यक्ष रवींद्र इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, सोयाबीनचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अशा परिस्थितीत शासन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करत नाही. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांचे फावते आहे. शासनालाही माहित आहे सोयाबीनचे उत्पादन झाल्यानंतर खाजगी व्यापारी कमी भावामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतात आणि त्यानंतर दोन महिन्यानंतर या सोयाबीनचे भाव वाढले जाणार आहेत त्यामुळे सोयाबीन विक्री करण्याची घाई करू नका असे ते म्हणाले. 

यावेळी विजय रणदिवे, रवींद्र इंगळे यांची ही भाषणे झाली. या परिषदेचे आयोजक शहापूरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले, या वेळी पप्पू पाटील, मोसिन पटेल, दुर्वा भोजने, मकबूल मुल्ला, गोकुळ शिंदे, युवराज नावडे, राजाराम सुरवसे आदी उपस्थित होते. या ऊस परिषद साठी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top