धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मौजे राघूचीवाडी ता.जि. धाराशिव येथील संदीप शोभा रमेश पाटील यांची सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना नितीन काळे म्हणाले की, “संदीप पाटील यांची ही नियुक्ती तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशातून त्यांची जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रमाचे दर्शन घडते. त्यांच्या मेहनतीने त्यांनी जिल्ह्यामध्ये नवे उदाहरण निर्माण केले आहे.” त्यांच्या वडिलांनी दूध विकून मुलाला शिक्षण दिले आणि आपल्या वडिलांचे श्रम मुलाने सार्थक ठरविले. येणाऱ्या काळात संदीप पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशाच प्रकारे जिल्ह्यातील युवक आपल्या कठोर परिश्रमातून विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढतील, असा आशावादही नितीन काळे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी भविष्यातील वाटचाली संदर्भात शुभेच्छा देऊन अभिनंदनही केले. संदीप रमेश पाटील हे आपल्या प्रशासकीय सेवेतून समाजातील वंचित दुर्बल घटकांच्या प्रगती व उन्नतीसाठी ते नक्कीच मोलाचे योगदान देतील, असा विश्वास यावेळी नितीन काळे यांनी व्यक्त केला.
 
