धाराशिव (प्रतिनिधी)-  आजचा दिवस हा रोजगाराचा उत्सव आहे,आशेच्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि शेकडो घरात आनंदाची उधळण करणारा सुवर्णक्षण आहे.आज देण्यात येणारा नियुक्ती आदेश म्हणजे आशा,प्रगती आणि न्यायाचे प्रतिक आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा रोजगार मेळाव्यातून अनुकंपा व लिपिक नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलताना श्री सरनाईक बोलत होते.

यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.विना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नव्या नियुक्तीधारक उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करून पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,जिल्ह्यात तब्बल १५१ उमेदवारांना आज नियुक्ती आदेश मिळत आहेत.यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या उमेदवारांसोबतच अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळवणाऱ्यांचाही समावेश आहे.हे आकडे नाहीत,तर १५१ कुटुंबांचे नवे भविष्य आहे असेही ते म्हणाले.

काही उमेदवारांनी आपल्या पालकांना गमावले असले तरी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,अनुकंपा नियुक्त्या या केवळ नोकऱ्या नसून शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि कुटुंबाच्या आधाराचे प्रतीक आहेत.तुमच्या हातात आलेले नियुक्ती आदेश हे फक्त नोकरीचे कागद नाहीत.ते समाजसेवेची संधी,प्रगतीची हमी आणि जनतेच्या विश्वासाची ग्वाही आहेत.ही संधी प्रामाणिकपणे व मनापासून काम करून सोन्याची करा.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,आजचा दिवस आनंदाचा आहे.राज्यात १० हजारापेक्षा जास्त अनुकंपा व राज्य लोकसेवा आयोगातून निवडलेल्या लिपिकांच्या नियुक्तीचे आदेश देत देण्यात येत आहे.अनुकंपा नियुक्तीचे सोपे धोरण जाहीर करून अनुकंपातील व्यक्तींना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे. राज्यात भविष्यात पोलीस विभागासह विविध विभागात भरती होणार आहे. राज्याची व जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने नियुक्त उमेदवारांना मिळाली आहे.जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या काळात यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे.जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प येत आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.सकारात्मकता वाढविणे गरजेचे असून सकारात्मकतेतून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून बोलताना जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.उमेदवारांची ज्या विभागात नियुक्ती झाली आहे,तिथे चांगले काम करावे.झिरो पेंडन्सीवर त्यांनी भर द्यावा असे ते म्हणाले. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी अनुकंपा भरतीतून जिल्हा कोषागार कार्यालय,धाराशिव येथे कनिष्ठ लेखापाल वर्ग-३ या पदावर नियुक्त पत्र मिळालेल्या श्रीमती पुजा घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अनुकंपा व राज्य लोकसेवा आयोगातून निवडलेल्या गट- क व  गट-ड वर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. यावेळी निवडलेले १५१ उमेदवार उपस्थित होते.त्यांनाही यावेळी नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासाठी गट-क वर्गातील १९ व गट-ड वर्गाचे ४०, जिल्हा परिषद धाराशिवकरिता गट-क वर्गाचे ९ आणि गट-ड वर्गाचे ३८,पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी गट-क वर्गाचे दोन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे गट- क वर्गातील ४३ असे एकूण गट- क मध्ये ७३ आणि गट-ड मध्ये ७८ अशा १५१ उमेदवारांना नियुक्ती आदेश आजच्या कार्यक्रमातून देण्यात आले.यामध्ये अनुकंपा भरती -२०२५ गट- क मध्ये २१ उमेदवार,महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२५ गट-क चे ४३ उमेदवार आणि अनुकंपा भरती २०२५ गट -ड वर्गाच्या ४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. 

यावेळी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित राज्य रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा रोजगार मेळाव्याला उपस्थित नवनियुक्त उमेदवार तसेच उपस्थितांनी बघितले.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी मानले.

 
Top