धाराशिव (प्रतिनिधी)- अलीकडील पुरामुळे जिल्ह्यातील पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असले तरी शासन व विविध स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. पशुपालकांना मदत व्हावी यासाठी चारा, औषधे, क्षार मिश्रण व आर्थिक मदत तत्परतेने पुरवली जात आहे.
परांडा, भूम व वाशी तालुक्यात आतापर्यंत 19.5 टन मुरघास वाटप करण्यात आले असून, आज आणखी 23 टन मुरघास शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.बायफ संस्थेमार्फत तेर, रामवाडी,हिंगळजवाडी व म्होतरवाडी येथे मोफत 100 किलो क्षार मिश्रण देण्यात आले असून,संस्थेचा 20 हजार शेतकऱ्यांसाठी लस व क्षार मिश्रण पुरवठ्याचा संकल्प आहे.
मुंबई व्हेटरनरी ॲल्युमिनी या संस्थेने परांडा तालुक्यातील शेलगाव दत्तक घेऊन पशुसंवर्धनासाठी विशेष उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वॉटरशेड फाउंडेशनकडून चारा, औषधे व लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याशिवाय राजाराम पाटील, कोल्हापूर एम.आर.यांच्याकडून व्हेटरनरी औषधे पुरवली जात आहेत,तर भारतीय किसान संघाच्या वतीने परांडा तालुक्यात अडीच टन चारा वाटप करण्यात आला असून 5 हजार होमिओपॅथिक किटचे वितरण होणार आहे. दरम्यान,जिल्ह्यात एकूण 406 जनावरांचा मृत्यू झाला असून यात 285 मोठी व 94 लहान दुधाळ जनावरे,तर 23 मोठी व 4 लहान ओढकाम करणारी जनावरे समाविष्ट आहेत.या हानीची भरपाई म्हणून महसूल विभागामार्फत 46.49 लाख रुपयांचा निधी पीडित पशुपालकांना वितरीत करण्यात आला आहे. पूरग्रस्त पशुपालकांना अन्नधान्याबरोबरच त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचीही काळजी घेणारी ही मदत हळूहळू त्यांना सावरत आहे.संकटाच्या काळात मिळालेल्या या सहकार्यामुळे पशुपालकांचा आत्मविश्वास पुन्हा दृढ होत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.