भूम (प्रतिनिधी)- “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून जनविश्वास बँकेचे चेअरमन संतोष सुरेश वीर यांनी आपल्या वडिलांची अन्नदानाची परंपरा अधिक जोमाने पुढे चालवत यंदाही 500 गरजू कुटुंबांची दीपावली गोड केली आहे. मागील चार वर्षांपासून जनविश्वास को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करून दीपावलीचा आनंद वाटला जात आहे.

या वर्षी तालुक्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. त्या पार्श्वभूमीवर जनविश्वास समूहाने सामाजिक बांधिलकी जपत “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या उपक्रमांतर्गत 500 कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटप केले. हा उपक्रम शुक्रवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी जनविश्वास बँकेत सहाय्यक निबंधक सुनिता ढोकळे व सहाय्यक सहकार अधिकारी के. जी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी चेअरमन संतोष वीर म्हणाले, “हे कार्य आम्ही दरवर्षी अधिक ताकदीने करतो आणि या कार्याला जनविश्वास बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार तसेच व्यापारी वर्ग यांचा सहकाररूपी आशीर्वाद लाभत आहे. ठेवीदारांचा विश्वास हा आमच्या बँकेचा सर्वात मोठा भांडवल असून आम्ही सर्व व्यवहार पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे करत आलो आहोत आणि पुढेही करत राहू.”

या कार्यक्रमास रवी लोंढे, आकाश शेंडगे, सोमनाथ टकले, सुजित जिकरे, कल्पेश राऊत, उमेश काळे, सचिन माळी, विवेक जोगदंड, रणजीत वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेच्या माध्यमातून सहकाराचा खरा अर्थ जनविश्वास बँक सातत्याने जपत आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.


 
Top