धाराशिव (प्रतिनिधी)-  यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे.त्या खालोखाल जळगाव व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो.चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या  विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

या वर्षी 18 आक्टोबर ते 27 आक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी 27 ऑक्टोबरला 39 कोटी 75 लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. 

एसटीच्या 31 विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून 20 कोटी 47 लाख रूपयांचे उपन्न आहे. त्यानंतर जळगाव 15 कोटी 60 लाख रूपयांचे उत्पन्न आहे. तर नाशिक 15 कोटी 41 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल 37 कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे. सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.


अतिवृष्टीमुळे 150 कोटीचा तोटा

यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे 150 कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन 34 कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात 1049 कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. 

 
Top