धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे जाहीर केले होते. परंतु काही भागातून नुकसानीची माहिती येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात परिपूर्ण मदत मिळेल अशी माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कृषीमंत्री दत्ता भरणे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यासाठी आले होते. पत्रकारांना अधिक माहिती देताना मंत्री भरणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत असे सांगून कार्यकर्त्यांची जरी स्वतंत्र लढण्याची इच्छा असली तरी याबाबत राज्यपातळीवर निर्णय केला जाणार आहे असे सांगितले. धाराशिव जिल्ह्यात 7 लाख 13 हजार 871 शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. त्यांचे 5 लाख 77 हजार 544 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यासाठी 522 कोटी 60 लाख रूपये मंजूर झाले आहेत. व काही शेतकऱ्यांना यांचे वाटपही झाले आहे. बाकी निधी 632 कोटी वाढीव मागणी झाली असल्याचेही कृषीमंत्री यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत 1 लाख 69 हजार लाभार्थी शेतकरी असून, त्यांना ट्रॅक्टर, कृषी औजारे यासाठी एकूण 901 कोटी रूपये मंजूर केले असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या घोषणा
जनसेवा शेतकरी संघटनेचे अमोज जाधव यांनी कृषीमंत्री भरणे यांच्या समोर कर्जमाफी कधी होणार? कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार या प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात गोधळ उडाला. त्यानंतर भरणे यांनी योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा होणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल असे सांगितले.
